वृद्ध महिलेला मारहाण करत चोरट्यांनी ऐवज लुटला पसरणीतील पहाटेची जबरी चोरी; नागरिकांत भीतीचे वातावरण

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा वाई : पसरणी (ता. वाई) येथे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास धक्कादायक जबरी चोरीची घटना घडली. सुषमा नगर परिसरातील एका बंगल्यात एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेला मारहाण करून चोरट्यांनी सुमारे पन्नास हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने लुटून नेल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पसरणी येथील शांताबाई किसन महांगडे (वय वर्षे ७५) या सुषमा नगर येथील बंगल्यात एकट्याच वास्तव्यास आहेत. गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून त्यांनी घरातील सर्व दारे-खिडक्या बंद केल्या व झोपल्या. मात्र शुक्रवारच्या पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर काहीतरी हालचाल व आवाज ऐकू आल्याने त्यांनी दरवाजा उघडला.
दरवाजा उघडताच तोंड बांधलेले तीन अज्ञात चोरटे अचानक समोर आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता शांताबाईंवर हल्ला केला. तोंड दाबून धरत त्यांना जबरदस्तीने घरात ओढून नेले. ओरडण्याचा प्रयत्न केल्यास जीवे मारण्याची धमकी देत चोरट्यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच घरातील कपाटात ठेवलेली सुमारे ५० हजार रुपयांची रोकड व दागिने चोरट्यांनी लंपास केले.
घटनेनंतर चोरटे पसार झाले. काही वेळाने शांताबाईंनी धीर एकवटत शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून गावात सर्वत्र सतर्कतेची सूचना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या घटनेचा अधिक तपास पोलीस बिट हवालदार बिरासदार करत असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल हालचाली व इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे पसरणी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!