निस्वार्थी व पारदर्शक समाजकारणातील पाईक श्री.अनिल भिलारे (नाना)

Spread the love

पुस्तकाचे गाव म्हणून जगाच्या कानाकोप-यात प्रसिद्ध होण्यापूर्वी भिलार हे महाबळेश्वर तालुक्याला दिशा देणा-या थोर स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार कै.भि.दा.भिलारे गुरुजी, कै.एम.आर.भिलारे साहेब व समाजभूषण कै.बाळासाहेब भिलारे(दादा) यांचा उज्वल राजकीय वारसा असणा-या महाबळेश्वर  तालुक्याच्या थोर व्यक्तीमत्वांचे गाव म्हणून नावारुपाला आले होते. या  गावाचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आत्ताचे भाजपा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष  श्री.अनिल भिलारे (नाना) हे देखील निस्वार्थी व पारदर्शक समाजकार्याच्या माध्यमातून या थोर व्यक्तीमत्वांचा वारसा चालवताना तालुका
वासियांना दिसत आहेत. ३० ऑक्टोबर श्री.अनिल भिलारे (नाना)यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.

 

महाबळेश्वर तालुक्याच्या राजकारणातील धुरंदर व्यक्तीमत्व कै. एम.आर.भिलारे यांचा राजकीय वारसा लाभलेल्या कुटुंबात नानांचा जन्म झाला.नाना लहानपणापासूनच हुशार,चाणाक्ष व दूरदृष्टी असलेल व्यक्तिमत्व असल्याने ते उच्च शिक्षण घेऊन अर्किटेक्ट झाले.शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या व्यावसायास सुरुवात केली.आपल्या कामावरील श्रद्धा, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि मेहनत व पारदर्शकता यांच्या जोरावर त्यांनी महाबळेश्वर परिसरातच नाही तर महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर देखील आपल्या कामाचा ठसा उमटवला व ते आपल्या व्यवसायात यशाच्या शिखरावर पोहोचले.स्वतःच्या व्यवसायात उत्तम प्रकारे स्थिरस्थावर असताना समाजकारणाचे बाळकडू असलेले नाना व्यवसायात गुरफटून पडले नाहीत.
आपल्या माध्यमातून इतर लोकांनाही फायदा व्हावा या उद्देशाने समाजकारनात आले. महाबळेश्वरचे प्रमूख पिक असलेली स्ट्रॉबेरी ही  एक फळ म्हणून मुंबईच्या बाजारपेठेत जात होती.स्ट्रॉबेरी हे नाशवंत फळ असल्याने त्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करुन त्यापासून निरनिराळी उत्पादने तयार करुन इथल्या शेतक-याची आर्थिक परिस्थिती सुधारावी व स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा ही संकल्पना नानांच्या मनात रेंगाळत होती आणि त्यातूनच नानांनी स्ट्रॉबेरीवर प्रक्रिया करुन विविध उत्पादने तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला व त्यासाठी कौशल्यप्राप्त मनुष्यबळ तयार व्हावे यासाठी स्थानिक गरजू तरुणांना स्वखर्चाने मुंबई येथे प्रशिक्षणासाठी पाठवून कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण केले.स्ट्रॉबेरीप्रक्रीया उद्योग स्थापन करणारे नाना पहिले स्थानिक उद्योजक होते.स्थानिक शेतकरी व बेरोजगार तरुण यांना डोळ्यासमोर ठेऊन समाजसेवेचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून सुरु केलेल्या व्यवसायात नानांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला पण नाना डगमगले नाहीत.

आपल्या व्यवसाय व्यस्त असताना देखील नाना सामाजिक बांधिलकी विसरले नाहीत. आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या समाजाचे आपण काहीतरी देणे देखील लागतो याचे भान ठेवून आपल्या समाजकार्यास समाजिक अधिष्ठान मिळावे या हेतूने गावातील होतकरु व समाजसेवेची आवड असणा-या तरुणांना एकत्र करुन नानांनी जनसेवा मंडळाची स्थापना केली व आपल्या सामाजिक कार्यास सुरुवात केली.जनसेवा मंडळाच्या माध्यमातून नानांनी त्या काळात मोफत सामुदायिक विवाह सोहळा,स्रीयांच्या सक्षमीकरणासाठी मोफत शिवणकाम वर्ग,बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातील स्थित्यंतरे लक्षात घेऊन गावातील लहान मुलांसाठी पहिली मोफत नर्सरी तसेच गावातील तरुण सुदृढ,निरोगी व व्यसनमुक्त रहावा यासाठी स्वखर्चाने  गावात पहिली व्यायामशाळा यासारखे अनोखे उपक्रम महाबळेश्वर तालुक्यात प्रथमच भिलार येथे नानांनी सुरू केले.

स्ट्रॉबेरीचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर.पण केवळ स्ट्रॉबेरी या ठराविक कालावधीसाठी असणा-या एकाच नगदी पिकावर अवलंबून रहाणे येथील सामान्य शेतक-यासाठी परवडणारे नाही.शेतीच्या जोडीला किफायतशीर पुरक व्यवसाय असावा या विचाराने महाबळेश्वर सारख्या प्रतिकूल हवामान असणा-या ठिकाणी नानांनी शेळीपालनासारखा तालुक्यासाठी अनोखा असणारा शेतीपूरक व्यवसाय स्वतःच्या जिद्दीने, कष्टाने व मेहनतीने यशस्वी करुन दाखवला हेच  नानांचे वेगळेपण. नानांकडून प्रेरणा घेऊन परिसरातील अनेक शेतकरी युवक या व्यवसायाकडे वळले आहेत ज्यांना आजदेखील नाना मार्गदर्शन व सहकार्य करत आहेत.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रिय असणारे नाना 2016 साली आपले ज्येष्ठ बंधू समाजभूषण कै. बाळासाहेब भिलारे दादा यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच भिलार ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मैदानात उतरले.कुटुंबाचा राजकीय वारसा व नानांचे अविरतपणे चालू असलेले समाजकार्य यामुळे पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीत नानांना भिलारच्या राजकीय वारसा असणा-या सुजाण मतदारांनी तालुक्यातील विक्रमी मताधिक्क्याने ग्रामपंचायतीवर निवडून दिले व नाना लोकअग्रहास्तव भिलार ग्रामपंचायतीचे उपसरपंच झाले. एक आदर्श ग्रामपंचायत असलेल्या भिलार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नानांनी आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली आणि लोकांचा विश्वास व मिळालेली संधी याचे सोने करण्याचा ध्यास नानांनी घेतला.उपसरपंच पदाच्या कालावधीत नानांनी स्वच्छ भारत मिशन उपक्रमांतर्गत कचरा मुक्त गाव मोहीम राबवून संपूर्ण गाव स्वच्छ केले.गावातील गटारांची सफाई स्वत: वैयक्तिक लक्ष देऊन करुन घेतली.कच-याची योग्य विल्हेवाट,पाणवठ्यांची स्वच्छता, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय,रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड यासारखे  अनेक उपक्रम राबवून नानांनी भिलार गावचा चेहरामोहरा बदलून टाकला.त्यांच्या या गावपातळीवरील कामाचा फायदा गावाला तत्कालीन शिक्षण मंत्री मा.श्री.विनोद तावडे साहेब यांच्या पुस्तकांचे गाव या संकल्पनेत  झाला. जगाच्या पाठीवर एकमेव असणारे पुस्तकांचे गाव या संकल्पनेत भिलार हे गाव बसले ते समाजभूषण कै.बाळासाहेब भिलारे(दादा) यांची दूरदृष्टी व त्यांच्या सोबतीस असणारे नानांचे गावातील प्रत्यक्ष कार्य.

समाजसेवेत नानांची असणारी नि:स्वार्थी भावन व त्याग हा त्यांच्या प्रत्येक कार्यातून दिसून येतो.उन्हाळ्याच्या दिवसात गावाला भासणारी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी नानांनी स्वत:च्या शेतातील उभ्या असणा-या  पिकाचा धिचार न करता पिकाचे पाणी बंद करून गावक-यांची तहान भागवण्यासाठी ते पाणी गावक-यांना पुरविले.

पहिल्या पाच वर्षातील नानांचे ग्रामपंचायतीमधील निस्वार्थी व पारदर्शक काम तसेच सामान्य गावक-याविषयी असणारी तळमळ पाहून दुस-या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत गावक-यांनी पुन्हा एकदा नानांना विक्रमी मतांनी ग्रामपंचायतीवर निवडून दिले आणि नानांच्या निस्वार्थी व पारदर्शक कारभाराला दाद दिली.

कोवीड19 च्या जागतिक महामारीत देखील नानांनी स्वतः पुढाकार घेऊन टाळेबंदीच्या कालावधीत गरजू असंख्य कुटुंबांना स्वखर्चाने धान्यादीमालाचे वाटप केले.केवळ एवढ्यावरच न थांबता गावात वाढणारी कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन गावात घरोघरी जाऊन कोव्हीडविषयी जनजागृती करुन बाधीत रुग्णांना भेटी देऊन त्यांची ऑक्सीजन पातळी व पल्सरेट तपासण्याचे काम स्वतः नानानी आरोग्य कर्मचा-यांसोबत राहून  केल व रुग्णांचे मनोबल वाढवून आजारावर मात करण्याची प्रेरणा नानांनी रुग्णांना दिली.

बदलत्या परिस्थितीनुसार स्थानिक शेतकरी, कष्टकरी जनतेच्या समस्या, बाहेरील धनदांडग्यांकडून पैसा व सत्तेच्या जोरावर होणारी सामान्य स्थानिक महाबळेश्वरकर नागरिकांची व शेतक-यांची होणारी पिळवणूक व त्यांनी साथ देणारे मुठभर स्थानिक बोलघेवडे नेते,स्थानिक तरुणांसमोर असणारी बेरोजगारीची समस्या  व त्याचा फायदा घेऊन या तरुणांना वाममार्ग दाखवणारे काही स्थानिक नटदृष्ट व्यक्ती बदलत्या परिस्थितीत महाबळेश्वरच्या पर्यटन व्यवसायासमोरील अडचणी,महाबळेश्वरच्या शेतक-याच्या अर्थकारणाचा कणा असलेली स्ट्रॉबेरी तिचे उत्पादन व विक्री यावरील उपाययोजना या सा-या प्रश्नांची जाण व अभ्यास असणारे व्यक्तीमत्व तसेच सर्व राजकीय,सामाजिक व आर्थिक विचारप्रवाहांना सोबत घेऊन जाण्याची ताकद म्हणजे नाना.

समजभूषण कै.बाळासाहेब भिलारे (दादा) यांच्या तालूक्यातील  अलौकिक कार्याचे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य व ताकद असणारे व्यक्तीमत्व म्हणून आज महाबळेश्वर तालुक्यातील सामान्य  शेतकरी व कष्टकरी नागरिक नानांकडे मोठ्या आशेने पाहतोय.

हे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य परमेश्वर श्री.अनिल भिलारे(नाना) यांना देवो.त्यांना उदंड,निरोगी,आरोग्य संपन्न आयुष्य लाभो जेणेकरून सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी व तालुक्याच्या विकासासाठी त्यांचा हातभार लागावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!