पिढीजात परंपरा खंडित; केदारेश्वर दांडेघर व भैरवनाथ पसरणी विजयादशमीची भाऊभेट खंडित..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : दांडेघर (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामदैवत केदारेश्वर आणि पसरणीचे ग्रामदैवत भैरवनाथ यांची विजयादशमीची हॅरिसन फॉली (थापा) येथील ‘भाऊ भेटी’ ची परंपरा या वर्षी खंडीत होत असून थापा (हॅरीसन फॉली) संदर्भात पसरणी ग्रामस्थ सकारात्मक धोरण अवलंबित नसल्याने दांडेघर ग्रामस्थांनी हा देव भेटीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आज केदारेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस सरपंच जनार्दन कळंबे, माजी सरपंच शंकरराव कळंबे, अजित कळंबे, राजेंद्र कळंबे, संजीव कळंबे, अमोल कळंबे, केदार जाधव, अशोक कासुर्डे, विनायक कळंबे, सुभाष कासुर्डे, भरत कळंबे, अरविंद कळंबे, विजय कळंबे, सुनील कळंबे व ग्रामस्थ उपस्थित होते.
दसऱ्याच्या दिवशी दांडेघर आणि पसरणी हे दोन्ही ग्रामस्थ एकत्रित येऊन सीमोल्लंघनाची गळाभेट घेण्याची प्रथा आहे. याने ऋणानुबंध दृढ होण्याची परंपरा आहे. या दिवशी पसरणीचे ग्रामदैवत भैरवनाथाची पालखी तर दांडेघर केदारेश्वरवी पालखी दोन्ही एकत्र थाप्यावर येतात. या ठिकाणी वर्षातून एकदा दोन्ही देव एकमेकांना भेटतात, अशी ग्रामस्थांची भावना आहे. यावेळी येथे सामुहिक देवांची आरती होते. ग्रामस्थांना पान सुपारी देऊन नंतर दांडेघरचे ग्रामस्थ भैरवनाथाच्या पालखीला तर पसरणीचे ग्रामस्थ केदारेश्वरच्या पालखीला खांदा देऊन पालख्या थाप्यावरून बाहेर निघतात. यावेळी सोन लुटलं जातं, दोन्ही गावाचे ग्रामस्थ गळाभेट घेऊन पसरणीची पालखी कुसगाव मार्गे तर दांडेघरची पालखी पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ होते. दोन्ही गावाच्या ग्रामदैवतांच्या भेटीतून गावचे संबंध अधिक दृढ करणारी परंपरा दरवर्षी जपली आहे.
ज्या ठिकाणी ही दसरा भेट होते त्या दांडेघर येथील केदारेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या मालकीच्या सर्वे नंबर 10, या हॅरीसन फॉलीच्या ताब्यावरून सुहास वाकडे आणि दांडेघर ग्रामस्थ यांच्यात वाद सुरू आहे. ग्रामस्थांच्या ताब्यात असणारी ही जागा वाकडे यांनी ताब्यात घेऊन परस्पर वेगवेगळ्या लोकांना भाड्याने देण्याचा सपाटा लावला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा अशा प्रकारास प्रतिबंध आदेश असतानाही असे प्रकार चालूच आहेत. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त आहेत. त्यामुळे पसरणी ग्रामस्थांनीही दांडेघर ग्रामस्थाना मदत करण्याऐवजी विरोधकांना मदत करीत असल्याने दांडेघर ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
त्यामुळे आम्ही यावर्षी दरवर्षी होणारी ही देवांची भेट घेणार नसल्याचा निर्धार बैठकीत करीत असल्याचे सांगितले आहे.
चौकट : दांडेघरचे ग्रामस्थ जयदिप रामचंद्र कळंबे यांनी दांडेघर ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी सातारा यांना सर्व्हे नंबर 10 मध्ये कोणताही व्यवसाय करणेस परवानगी न देणे बाबत पत्र दिले होते याबाबत उपजिल्हाधिकारी यांनी सर्वे नंबर 10 मध्ये सुरु असलेले अनाधिकृत व्यवसाय तात्काळ बंद करणेत यावेत असे आदेश दिले असतानाही या ठिकाणी व्यवहार चालू असल्यानेच या ठिकाणी देवांची भेट होत नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये झाली आहे

