खर्शी–बारामूरेत भाजप एकसंध; गोरख महाडिकांच्या विजयासाठी जीव तोडून काम करणार – श्रीहरी गोळे
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : म्हसवे गटांतर्गत खर्शी–बारामूरे गणातील भाजपचे अधिकृत उमेदवार गोरख महाडिक यांच्या विजयासाठी आपण स्वतः जीवाचे रान करणार असून, आपण कोठेही नाराज नसल्याची स्पष्टोक्ती माजी जावळी तालुका प्रमुख श्रीहरी गोळे यांनी पत्रकार परिषदेत केली. उमेदवारी मागे घेतल्यानंतर आपण नाराज असल्याच्या पसरलेल्या चर्चांना पूर्णविराम देत गोळे यांनी भाजपातील एकजुटीचा ठाम संदेश दिला.

श्रीहरी गोळे पुढे म्हणाले की, खर्शी–बारामूरे गणातील आपली उमेदवारी आपण स्वतः मागे घेतल्यानंतर आपण नाराज असल्याची आवई जाणीवपूर्वक उठवण्यात आली. मात्र, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. भाजपचे आपण सक्रिय पदाधिकारी असून, नेहमीच ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शब्दाला प्रमाण मानून पक्षासाठी काम करत आलो आहोत. भाजपच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ राहून कार्य करणे, हाच आपला राजकीय मार्ग आहे.
या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून गोरख महाडिक यांना संधी दिली असून त्यांचा विजय हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज न ठेवता सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रचारात उतरावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भाईजी गावडे यांनीही गोरख महाडिक यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला. श्रीहरी गोळे व भाईजी गावडे यांनी संयुक्तपणे शब्द देत सांगितले की, आम्ही दोघेही संपूर्ण ताकद पणाला लावून, जीव तोडून काम करून गोरख महाडिक यांना खर्शी–बारामूरे गणातून मोठ्या मताधिक्याने विजयी करून दाखवू.
या पत्रकार परिषदेमुळे भाजपमधील अंतर्गत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, खर्शी–बारामूरे गणात भाजप एकसंधपणे निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

