वसंतराव मानकुमरेंचा विराट शक्तीप्रदर्शनात अर्ज दाखल; जावलीच्या राजकारणात पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध”
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा मेढा : जावली तालुक्याच्या राजकारणातील ‘किंग मेकर’ आणि भाजपची ‘बुलंद तोफ’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी आज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विराट रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा आणि शंका-कुशंकांना या भव्य शक्तीप्रदर्शनाने पूर्णविराम मिळाला आहे.

आज सकाळी म्हसवे गटातील गणेशपेठ येथून या रॅलीला सुरुवात झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या रॅलीत ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मोठी उपस्थिती यामुळे म्हसवे गटात भाजपमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष असा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या वसंतराव मानकुमरेंनी आतापर्यंत अनेक निवडणुकांत विजय मिळवला आहे. दुर्गम भागातील रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि शेतीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याच विकासकामांच्या जोरावर ते पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत जाण्यासाठी सज्ज झाले असून, ही निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

