म्हसवे गणातून रेश्मा पोफळेंच्या उमेदवारीसाठी समाधान पोफळेंची मोर्चेबांधणी; पंचायत समितीवर लक्ष केंद्रीत वालुथचे विकास नेतृत्व पंचायत समितीकडे; रेश्मा पोफळे यांची प्रबळ दावेदारी

Spread the love

गिरीस्थान  टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील म्हसवे गणातून पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, वालुथ गावचे उपसरपंच तसेच सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष समाधान पोफळे यांनी आपल्या पत्नी सौ. रेश्मा समाधान पोफळे यांच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंचायत समिती निवडणुकीत म्हसवे गणातून प्रवेश करण्याचा त्यांनी निर्धार केला असून, त्यादृष्टीने आज झालेल्या भाजप निवडणूक कोअर कमिटीकडे मुलाखतीमध्ये सहभागी होऊन उमेदवारासाठी मागणी केली आहे.

सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले समाधान पोफळे यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यशैलीच्या जोरावर राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व तालुक्यातील प्रभावशाली वसंतराव मानकुमारे नेतृत्वाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. वालुथ गावाचे सुपुत्र असलेल्या पोफळेंनी उपसरपंच आणि सरपंच पदाच्या कार्यकाळात अनेक विकासकामे मार्गी लावत गावाचा चेहरामोहरा बदलण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

रस्ते, पाणीपुरवठा, गटार योजना, ग्रामसुविधा तसेच इतर मूलभूत सोयी-सुविधांच्या कामांमुळे वालुथ गावात विकासाची गती वाढली असून, हाच विकासाचा धडाका संपूर्ण तालुक्यात पोहोचवण्यासाठी आता पंचायत समितीमध्ये जाणे गरजेचे असल्याचे मत समाधान पोफळे समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, म्हसवे गणामध्ये यावेळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यामुळे सौ. रेश्मा पोफळे यांचे नाव स्वाभाविकपणे पुढे येत आहे. भाजपकडूनही तुल्यबळ आणि विश्वासार्ह उमेदवार म्हणून समाधान पोफळे यांच्याच कुटुंबाकडे पाहिले जात असून, वालुथ ग्रामस्थांसह म्हसवे गणातील कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठी जोरदार आग्रह धरला जात आहे.

या पार्श्वभूमीवर रेश्मा पोफळे यांचे नाव उमेदवारीसाठी अग्रस्थानी असून, आगामी काळात ही उमेदवारी अधिकृत जाहीर झाल्यास म्हसवे गणातील निवडणूक लढत चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. तालुक्यातील राजकारणात यामुळे नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून, पंचायत समितीच्या निवडणुकीत समाधान पोफळे यांची ही खेळी कितपत यशस्वी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!