पाचगणी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित बॉडीचा विकासकामांचा धडाका; झालावाडी ते जन्नीमाता मंदिर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण शुभारंभ

Spread the love

 गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा-नगरसेवकांनी सत्ता स्थापनेनंतर शहराच्या विकासाला वेग देण्याचा निर्धार करत कामांचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाचगणी–राजपुरी रस्त्यावरील शहर हद्दीतील झालावाडी ते जन्नीमाता मंदिर या दरम्यानच्या अरुंद रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज नगराध्यक्ष दिलीप बगाडे व सहकारी नगरसेवकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

पाचगणी : येथील झालावाडी – जन्नीमाता मंदिरपर्यंतचा रस्ता रुंदीकरण कामाचा शुभारंभ करताना नगराध्यक्ष दिलीप बगाडे, शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, सुप्रिया माने आदी..

या प्रसंगी नगरसेवक शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, महेश खांडके, राजेंद्र पारठे, अमित कांबळे, आकाश बगाडे, परवीन मेमन, विमल भिलारे, राजश्री सणस, स्वाती कांबळे, अमृता गोळे, शिल्पा माने, माधुरी कासुर्डे, सुप्रिया माने, तसेच ठेकेदार गणेश राजपुरे, प्रशांत मोरे, महेश माने, आदी मान्यवर उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सहकारी सदस्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तात्काळ पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याआधी प्रभाग क्रमांक दोनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे सुशोभीकरण, सिडने पॉईंट येथे सेल्फी पॉईंट गॅलरी व विरंगुळा बेंच उभारणी अशा महत्त्वाच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती. आता पाचगणी–राजपुरी रस्त्यावरील झालावाडी ते जन्नीमाता मंदिर या महत्त्वाच्या मार्गाचे रुंदीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

हा रस्ता शहरातील एक महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून तो अरुंद असल्याने नागरिक व पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः समोरासमोर येणाऱ्या दोन वाहनांना एकमेकांना मार्ग देताना वाहतूक कोंडी होत असे. आता या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुलभ होणार असून अपघातांची शक्यता कमी होण्यासही मदत होणार आहे. यामुळे नागरिकांसह पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
नवनिर्वाचित नगरपरिषदेची ही विकासाभिमुख वाटचाल शहराच्या प्रगतीसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असून आगामी काळात आणखी अनेक महत्त्वाची विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

चौकट :
झालावाडी ते जन्नीमाता मंदिरपर्यंतचा रस्ता अरुंद असल्याने अनेकदा दुचाकी व चारचाकी वाहनांना एकाच वेळी ये-जा करताना अडचणी येत होत्या. आता या रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याने वाहतुकीची समस्या दूर होऊन प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!