हातगेघरमध्ये विकासाला गती; महू–हातगेघर धरण उजव्या कालवा व शेतरस्त्याच्या कामांना युद्धपातळीवर प्रारंभ

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : हातगेघर (ता. जावली)  परिसरातील शेती सिंचन व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या महू – हातगेघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या उर्वरित पाईपलाईनच्या कामास तसेच गाव शेतरस्त्याच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजें भोसले उर्फ बाबाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकासकामे वेगाने मार्गी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 जावळी तालुक्यातील मौजे हातगेघर येथील हातगेघर ते पानस या महू–हातगेघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या उर्वरित पाईपलाईन कामाचा शुभारंभ भाजपा जावलीचे माजी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, उपसरपंच शंकर गोळे, माजी सरपंच शिवाजी दीक्षित, माजी उपसरपंच जगन्नाथ गोळे, सर्जेराव गोळे, तुकाराम गोळे आदी ज्येष्ठ ग्रामस्थ तसेच युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर गोळे, बाळू काशिनाथ गोळे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पी. व्ही. आर. कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर ए. एस. प्रसाद, सुपरवायझर यादव, रामन्ना रेड्डी, राजू रेड्डी हेही उपस्थित होते.

त्याचबरोबर ग्रामस्थांच्या मागणीनुसार साईबाबा मंदिर ते माळवीचा ओढा या शेतरस्त्याच्या कामाचाही शुभारंभ पी. व्ही. आर. कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रसाद यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार बाबाराजेंनी दिलेल्या सूचनेनुसार ही दोन्ही कामे युद्धपातळीवर सुरू असून मार्च एंडिंगपूर्वी महू–हातगेघर धरणाच्या दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी माहिती जलसंपदा विभाग कृष्णा खोरेचे अधीक्षक अभियंता शिंदे व डाव्या कालव्याचे कार्यकारी अभियंता घार्गे यांनी दिली.
दरम्यान, हातगेघर उपसा सिंचन योजनेला मार्च महिन्यापूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळेल, असे आश्वासन नामदार बाबाराजेंनी यापूर्वीच ग्रामस्थांना दिले आहे.

या योजनेमुळे धरणाच्या वरील डोंगराळ भागातील सुमारे २७० हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीला विशेष बाब म्हणून पाणी उपलब्ध होणार असल्याने हातगेघर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामांमुळे हातगेघर व परिसरातील शेतीला कायमस्वरूपी सिंचनाचा आधार मिळून विकासाला नवी दिशा मिळेल, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!