स्वच्छतेच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये पाचगणी देशात प्रथम; उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पर्यटननगरी पाचगणीने स्वच्छतेच्या क्षेत्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अंतर्गत केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेल्या प्रतिष्ठेच्या ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशभरातील शहरांच्या गटात पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशामुळे पाचगणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, उद्या ११ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नगरपरिषदेला सन्मानित करण्यात येणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने यंदापासून ‘सुपर स्वच्छ लीग’ ही विशेष श्रेणी सुरू केली आहे. सन २०२१, २०२२, २०२३ आणि २०२४ या सलग चार वर्षांत स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक शहरांचा यामध्ये समावेश करण्यात आला. यंदा या स्पर्धेचे निकष अधिक कठोर करण्यात आले होते. या लीगमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ८५ टक्के गुण मिळवणे आवश्यक होते. पाचगणीने हे आव्हान यशस्वीपणे पेलत ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला.
शहरातील घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण, नागरिकांचा सहभाग आणि पर्यटनस्थळाचे सौंदर्य व स्वच्छता टिकवण्यासाठी राबविण्यात येणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम या यशामागील महत्त्वाचे घटक ठरले आहेत.
नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे, घाटजाई विकास आघाडीचे सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच नागरिकांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांना या राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने मोठी पावती मिळाली आहे.
पाचगणीच्या पर्यटन वैभवाबरोबरच स्वच्छतेचा आदर्श देशासमोर निर्माण करणारा हा सन्मान शहरासाठी अभिमानास्पद ठरणार असून, या यशामुळे आगामी काळातही स्वच्छतेची परंपरा अधिक बळकट करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

