हातगेघर सोसायटी ठरावावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; श्रीहरी गोळेंकडून मानकुमरे यांच्या आरोपांचे खंडन
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : हातगेघर विकास सेवा सोसायटीच्या रद्द झालेल्या ठरावावरून जावळी तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी केलेल्या आरोपांचे माजी भाजपा जावळी अध्यक्ष श्रीहरी तुकाराम गोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे खंडन केले आहे. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात कोणतेही भांडण, धरपकड अथवा फरफट झाल्याचा प्रकार घडला नसल्याचा दावा गोळे यांनी केला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासकीय विश्रामगृहात ‘सेवा अभियान’ अंतर्गत भाजपा कार्यकर्ते व नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री विक्रमजी पावसकर, आमदार धैर्यशील कदम, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते, असे गोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
महू-हातगेघर धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली. त्यावेळी वसंतराव मानकुमरे यांनी निवेदने स्वीकारू नयेत, तसेच हातगेघर सोसायटीच्या ठरावामुळे आपला ठराव झाला नसल्याचे सांगून वाद घातल्याचा दावा गोळे यांनी केला आहे. सहागाव पंचक्रोशीतील सोसायटी सदस्यांना विरोध केल्यामुळे मानकुमरे यांना सूचक-अनुमोदक मिळाले नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
ठरावापूर्वीच संबंधित वरिष्ठ नेत्यांना माहिती देऊन सहागाव पंचक्रोशीतील बैठक घेऊन मतभेद सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याचे गोळे यांनी म्हटले आहे.
पत्रकातून गोळे यांनी मानकुमरे यांच्यावर पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी छुपी युती तसेच मागील लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात काम केल्याचे आरोप केले आहेत. मानकुमरे यांनी आपल्याला धमकी दिल्याचाही दावा त्यांनी केला असून, त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी सार्वजनिक शिस्त पाळत तेथून निघून गेल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, जावळी तालुक्यातील जुन्या भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पक्षीय व प्रशासकीय पदांपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप गोळे यांनी केला. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने याप्रकरणी हस्तक्षेप करून जुन्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

