कुसुंबी गणातील गावांना अंकुश (बाबा) कदम यांचा आभार दौरा; मतदारांशी साधला संवाद

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी नवी मुंबईचे संपर्कप्रमुख तसेच नवनिर्वाचित नवी मुंबई महानगरपालिका विस्कृत नगरसेवक अंकुश (बाबा) कदम यांनी जावली दक्षिणमधील कुसुंबी गणातील विविध गावांचा दौरा केला. या आभार दौऱ्यादरम्यान त्यांनी ऐकीव मुरा, चिकनवाडी, मोळेश्वर, आपटी मुरा, आखाडे वस्ती, निपाणी मुरा, म्हाते मुरा, तेटली मुरा आणि सह्याद्रीनगर या गावांना भेट देत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेवर विश्वास ठेवत मतदारांनी पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. या पार्श्वभूमीवर मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कदम यांनी हा आभार दौरा आयोजित केला होता.

दौऱ्यादरम्यान गावोगावी नागरिकांनी कदम यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा व सूचना जाणून घेतल्या. विकासाच्या कामांबाबत ग्रामस्थांनी मांडलेल्या मुद्द्यांची नोंद घेऊन त्यावर सकारात्मक पद्धतीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी बोलताना कदम म्हणाले की, हा विजय केवळ मतांचा नसून जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आहे. विकासाच्या विचारांवर आणि लोकाभिमुख कामांवर विश्वास ठेवून मतदारांनी दिलेला कौल अत्यंत महत्त्वाचा आहे. या विश्वासाचा मान राखत प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक वेगाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळेच हा प्रवास अधिक सक्षम होत आहे. हा विजय जनतेचा असून पुढील वाटचालही जनतेसाठीच असेल,” असे सांगत त्यांनी सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!