पाचगणीत आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन उत्साहात ;सुरक्षा साहित्य वाटप, शासकीय योजना कार्ड वितरण व स्वयं-सहायता गट प्रशिक्षण

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणित हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन २०२६ निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या कचरा वेचक बांधवांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता व आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिनाचे महत्त्व स्पष्ट करत, समाजाच्या स्वच्छतेमागे कचरा वेचकांचे योगदान किती अनमोल आहे यावर प्रकाश टाकला. त्यांनी या दिनाच्या माध्यमातून कचरा वेचकांच्या हक्क, आरोग्य व सन्मानाबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते कचरा वेचकांना सुरक्षा साहित्य (सेफ्टी गिअर) वाटप करण्यात आले. दैनंदिन कामकाज करताना सुरक्षितता सुनिश्चित व्हावी यासाठी बूट, हातमोजे, मास्क, जॅकेट आदी साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे कचरा वेचकांच्या आरोग्य संरक्षणास मोठी मदत होणार आहे.

तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना यांचे वितरण करण्यात आले. या योजनांमुळे कचरा वेचकांना आरोग्य व विमा संरक्षणाचा आधार मिळणार आहे.

कार्यक्रमांतर्गत माधवी जगदाळे यांनी स्वयं-सहायता गट (SHG) स्थापनेचे महत्त्व व त्याचे फायदे यावर मार्गदर्शनपर प्रशिक्षण सत्र घेतले. बचत सवय विकसित करणे, सूक्ष्म कर्जसुविधा उपलब्ध करून घेणे, उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण करणे आणि सामाजिक सक्षमीकरण साध्य करणे या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमासाठी मुख्याधिकारी पंडित पाटील, नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आरोग्य सभापती सौ. राजश्री सणस, सौ. शिल्पा माने, सौ. माधुरी कसुर्डे, श्री. गणेश कसुर्डे व श्री. आकाश बागडे उपस्थित होते. मान्यवरांनी कचरा वेचकांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या सन्मान, सुरक्षितता व सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद व हिलदारी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी हिलदारीचे गणेश शेडगे, निखील खरात, दिपाली धनवडे, अस्मिता कासुर्डे, प्राजक्ता बोडरे व दीपक मदने यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!