भोसे खिंड येथे मध्यरात्रीच्या हुल्लडबाजी प्रकरणी ; पाचगणी पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भोसे, खिंड (तालुका महाबळेश्वर ) येथे पाचगणी – महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर मध्यरात्री भररस्त्यात हुल्लडबाजी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी आठ जणांवर पाचगणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पाचगणी पोलिसांच्या धडक कारवाईचे कौतुक होत आहे.

पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे २.०० वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर तालुक्यातील भोसे खिंड येथील मुख्य चौकात, पाचगणी–महाबळेश्वर मार्गावर काही तरुणांनी आपली चारचाकी वाहने रस्त्यामध्ये उभी करून मोठ्या आवाजात गाणी लावून नाचगाणी व आरडाओरडा सुरू केला होता. या प्रकारामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला तसेच परिसरातील नागरिक व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने व पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे यांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली.

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर संबंधित हुल्लडबाजांची ओळख पटविण्यात आली. त्यामध्ये राम जितेंद्र गोळे (वय २०), रोहित मिलिंद कांबळे (वय २०), शंकर देवानंद कोळी (वय २३), पवन आनंदा अनपट (वय २०), शुभम उर्फ साहील सुभाष गायकवाड (वय २१), उद्धव रामदास कार्य (वय २१), आयुष महेश काळभोर (वय २०) आणि साहील सुशील चव्हाण (वय २१) यांचा समावेश आहे. सर्वजण सातारा जिल्ह्यातील विविध भागातील रहिवासी आहेत.

सदर इसमांनी सार्वजनिक ठिकाणी वाहन रस्त्यात उभे करून साऊंड सिस्टीमचा मोठ्या आवाजात वापर करत नाचगाणी व आरडाओरडा केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचली. प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.

पाचगणी हे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून दरवर्षी हजारो पर्यटक सहकुटुंब येथे भेट देतात. अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करून पर्यटनस्थळाला गालबोट लावणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या या ठोस कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले  असून, भविष्यात अशा प्रकारांना अजिबात सहन केले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!