महाराष्ट्र राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धेत साताऱ्याच्या श्रेयश मानेला सुवर्णयश; ५२ – ५६ किलो वयोगटात प्रथम क्रमांक
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : मूर्तिजापूर (जि. अकोला) येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धेत ५२ ते ५६ किलो वजनी गटात साताऱ्याच्या श्रेयश दीपक माने याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. राज्यभरातील दर्जेदार खेळाडूंशी लढत देत श्रेयशने दाखवलेली ताकद, तंत्र आणि आत्मविश्वास यामुळे त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे.

श्रेयशला बॉक्सिंगचे शास्त्रशुद्ध आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षक कोच विनोद मनोज दाभाडे यांनी दिले. नियमित सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि योग्य प्रशिक्षण याच्या जोरावर श्रेयशने राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. प्रत्येक लढतीत त्याने संयम, वेग आणि अचूक मारा यांचा उत्तम संगम साधत विजय मिळवला.
या उल्लेखनीय यशाबद्दल मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. पिंपळे यांच्या हस्ते श्रेयशला सुवर्णपदक प्रदान करून गौरवण्यात आले. यावेळी क्रीडाप्रेमी, शिक्षक, पालक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी श्रेयशच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्रेयश हा दीपक वसंत माने व मनीषा दीपक माने यांचा सुपुत्र असून, हे दोघेही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मढें केंद्र (लिंब), ता. सातारा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. क्रीडा व शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत माने कुटुंबाची उल्लेखनीय परंपरा आहे. श्रेयशचे वडील दीपक वसंत माने यांनी यापूर्वी सक्षमीकरण स्पर्धेत तालुकास्तरीय ४०० मीटर धावण्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे पालकांचा शैक्षणिक व क्रीडाप्रवण वारसा, शिक्षकांची प्रेरणा आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांचा संगम श्रेयशच्या यशामागे ठळकपणे दिसून येतो.
या घवघवीत यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक तसेच ग्रामीण भागातून श्रेयशवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात तो राष्ट्रीय पातळीवर चमकेल, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त केला जात आहे

