टेबल लँड स्वच्छतेसाठी युवकांचा पुढाकार; २५० किलो कचऱ्याची विल्हेवाट
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणीतील सुप्रसिद्ध टेबल लँड परिसर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी रोटरॅक्ट क्लब, पाचगणी यांच्या पुढाकाराने गुरुवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी “बटरफ्लाय गार्डन ते टेबल लँड” या मार्गावर भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद, हिलदारी व विद्या निकेतन हायस्कूल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या मोहिमेत एकूण ४० स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रस्त्याच्या कडेला तसेच पर्यटनस्थळ परिसरात साचलेला प्लास्टिक, काच, जुने कपडे व इतर कचरा गोळा करण्यात आला. सुमारे २२ पोती कचरा संकलित करण्यात आला असून त्याचे वजन अंदाजे २५० किलो इतके असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
टेबल लँड हे पाचगणीतील तसेच देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे. दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देत असल्याने परिसर स्वच्छ ठेवणे व पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण होऊन शहराची सकारात्मक प्रतिमा निर्माण होण्यास मदत होते, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.
नगरपरिषदेच्या सहकार्याने संकलित कचऱ्याची योग्य व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी रोटरॅक्ट क्लबचे विरेन माने, विराज बिरामणे, अमेय भिलारे, अबोली कासुर्डे, स्वदेश परदेशी, तोसीफ अत्तार, ओंकार भगत, स्मृतिका करंजकर व योगेश गायकवाड तसेच हिलदारी टीमचे डॉ. मुकेश कुळकर्णी, दीपक मदने, गणेश शेंडगे, दिपाली धनवडे, अस्मिता कासुर्डे, प्राजक्ता बोडरे व निखिल खरात यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता स्वच्छता राखावी व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

