“ हुमगाव – आखाडे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकरी संघटनेचा वनविभागाला घेराव” “शेतात बिबट्या, कार्यालयात शेतकरी! – कमलाकर भोसले यांचा इशारा”

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील हुमगाव–आखाडे, वालुथ, जरेवाडी, खर्शी–बारामुरे, महू या परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी रात्री शेतात पाणी धरायला जाण्यास घाबरत असून, लहान मुले शाळेत जाण्यासही भीत आहेत. मात्र, याबाबत वारंवार फोन करूनही वनविभागाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे.

यापार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर (नाना) भोसले यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी आज हुमगाव–आखाडे परिसरात आलेल्या मेढा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी भोसले यांनी,

“कागदी घोडे नाचवायचे आणि शेतकऱ्यांना वेटीस धरायचं यापलीकडे तुमचं दुसरं काम नाही. बिबट्या शेतात फिरतोय, मुलं शाळेत जायला घाबरतायत, आणि तुम्ही मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसलात!” अशा तीव्र शब्दांत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

आज वनविभागाचे अधिकारी गावात दाखल होताच संतप्त शेतकरी व ग्रामस्थांचा उद्रेक झाला. भोसले यांनी अधिकाऱ्यांसमोरच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला; मात्र वरिष्ठांचा फोन स्विच ऑफ लागल्याने ते अधिकच आक्रमक झाले.

 

“जर वनविभागाला बिबट्याचेच संरक्षण करायचे असेल, तर आम्ही उद्यापासून शेती काम बंद करून थेट वनविभागाच्या कार्यालयात मुक्काम ठोकू. आमच्या जेवण्या-खाण्याची आणि राहण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी,” अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी जाहीर केली.

 

भोसले पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांनी एखादी झाडाची फांदी तोडली तरी लाखो रुपयांचा दंड लावणारा वनविभाग, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानाकडे मात्र दुर्लक्ष करतो. रस्त्यावर दिवसा ढवळ्या वन्य प्राणी फिरत असतानाही अधिकारी गप्प बसले आहेत. शासनाला जर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करता येत नसेल, तर किमान बळीराजाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा आणि मग खुशाल वन्यप्राण्यांचे संरक्षण करा!”

 

यावेळी आखाडे गावचे सरपंच सखाराम गायकवाड, अशोक सरकाळे यांच्यासह आखाडे–हुमगाव पंचक्रोशीतील असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जर लवकरात लवकर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!