राजेंद्रशेठ राजपुरेंचे जिल्हा बँकेतील वर्चस्व कायम! पत्नी रूपाली राजपुरे यांचा सोसायटी मतदारसंघातून दणदणीत विजय; १२ पैकी ८ मते मिळवत प्रतिस्पर्ध्याचा पराभव
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महाबळेश्वर तालुका सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या पत्नी सौ. रूपाली राजेंद्र राजपुरे यांनी विजय संपादन केला आहे. या विजयामुळे राजेंद्र राजपुरे यांनी जिल्हा बँकेतील आपले राजकीय वर्चस्व आणि अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राजेंद्र राजपुरे आणि त्यांच्या पत्नी रूपाली राजपुरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, दहा वर्षे संचालकपद भूषविलेल्या व्यक्तींना निवडणूक लढविण्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांमुळे राजेंद्र राजपुरे यांना स्वतः निवडणूक लढविणे शक्य झाले नाही. त्यामुळे ऐनवेळी त्यांच्या पत्नी सौ. रूपाली राजपुरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले.
महाबळेश्वर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात राजेंद्र राजपुरे यांचे पूर्वीपासूनच मजबूत राजकीय व सहकार क्षेत्रातील प्राबल्य राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीचा विजय निश्चित मानला जात होता. प्रत्यक्ष निवडणुकीत विरोधी उमेदवार किती मते मिळविणार, याबाबतच उत्सुकता होती.
या निवडणुकीत एकूण १२ सोसायटी मतदारांनी मतदान केले. त्यापैकी सौ. रूपाली राजपुरे यांना आठ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार संजय मोरे यांना चार मतांवर समाधान मानावे लागले. चार मतांच्या फरकाने रूपाली राजपुरे यांनी विजय मिळविला.
या निकालाने राजेंद्रशेठ राजपुरे यांचे महाबळेश्वर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वजन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. स्वतः निवडणूक लढविता आली नसली, तरी पत्नीच्या विजयातून त्यांनी जिल्हा बँकेतील आपले अस्तित्व आणि प्रभाव कायम राखल्याची चर्चा सहकार क्षेत्रात रंगू लागली आहे.

