शिवछत्रपती तायक्वांदो स्पर्धेत पाचगणीच्या १०विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; नगरपरिषदेत गौरव सोहळा उत्साहात
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो अकॅडमी (वाई-खंडाळा, महाबळेश्वर) अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या पाचगणी नगरपरिषद शाळा क्रमांक १ व २ तसेच इतर शाळांतील विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती चषक तायक्वांदो स्पर्धेत १० विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. या यशस्वी विद्यार्थ्यांचा पाचगणी नगरपरिषदेच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण १० विद्यार्थ्यांनी पदकांची लयलूट करत पाचगणीचा झेंडा उंचावला. या पार्श्वभूमीवर आयोजित गुणगौरव सोहळ्यास नगराध्यक्ष दिलीप बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, नगरसेवक शेखर कासुर्डे, राजश्री सणस, परवीन मेमन, सुप्रिया माने, आकाश बागडे, गणेश कासुर्डे तसेच शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रथमतः पदक विजेत्या विद्यार्थ्यांची बाजारठेतून ढोल ताशांच्या गंजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमात सर्व पदक विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी नगरसेवक शेखर कासुर्डे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, “नगरपरिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात केलेली ही कामगिरी अभिमानास्पद आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शैक्षणिक व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे.”
या स्पर्धेत प्राची बेलोशे, आयुष सपकाळ, शुभ्रा घोणे, आरोही केळगणे यांनी सुवर्णपदके पटकावली, तर श्रावणी प्रभाळे, आराध्या कदम यांनी रौप्यपदके मिळवली. तृषा धनावडे, मनीषा भगत, आकांक्षा बनसोडे, कांस्यपदक यांनी मिळवून संघाच्या यशात भर घातली. तसेच दिव्या बनसोडे हिने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत विशेष कामगिरी बजावली.
चौकट : यावेळी ब्लॅक ड्रॅग अकॅडमीच्या वाई तसेच महाबळेश्वर मधील तायक्वांदो स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ब्लॅक ड्रॅगन अकॅडमीचे प्रशिक्षक विशाल कुमठे यांनी केले, तर सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने यांनी केले. या यशामुळे पाचगणीतील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

