पाचगणी बसस्थानकात एकाच दिवशी दोन एसटी गाड्या नादुरुस्त; प्रवाशांचे हाल, आगारांच्या अपुऱ्या गाड्यांचा फटका
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी बसस्थानकात मंगळवारी प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. एकीकडे लोकल वाई–महाबळेश्वर ही सकाळी १० वाजताची बस अचानक बंद पडली, तर दुसरीकडे लांब पल्ल्याची पुणे–गणपतीपुळे ही ११:३० वाजताची बस देखील पाचगणी स्थानकात नादुरुस्त झाल्याने प्रवाशांचा चांगलाच घोटाळा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांचे पुढील प्रवासाचे नियोजन कोलमडले.

सध्या महाराष्ट्रातील अनेक एसटी आगारांत पुरेशा प्रमाणात नवीन गाड्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे जुन्याच बसेस रस्त्यावर धाववल्या जात आहेत. या जुन्या बसेस अनेकदा प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रकार घडत असून, पसरणी घाटासारख्या अवघड मार्गावरही गाडी गरम होणे किंवा अचानक नादुरुस्त होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.
आगारांकडे उपलब्ध असलेल्या मर्यादित गाड्या आणि त्यावर ग्रामीण व खेडेगावांमधून होणारी मोठी प्रवासी मागणी यामुळे आगारप्रमुखांना मोठी कसरत करावी लागत आहे. मधल्या काळात केवळ पाच नव्या गाड्या देऊन तात्पुरती बोळवण करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात प्रवाशांची संख्या आणि ठरलेले मार्ग पाहता या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. परिणामी जुन्याच बसेसवर जास्त ताण येत असून त्या वारंवार नादुरुस्त होत आहेत.
या सर्व प्रकाराचा थेट फटका प्रवाशांना बसत असून, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने तातडीने नवीन गाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.

